नाशिक: हरभऱ्याचे १४१ क्विंटल बियाणे मिळणार ५० टक्के अनुदानावर

नाशिक। दि. ९ ऑक्टोबर २०२५: जिल्हा परिषद सेस फंड योजना सन २०२५ – २६ अंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी ५० टक्के अनुदानावर एकूण १४१.४० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

या योजनेच्या अटी व शर्थी अशा : प्रथम येणााऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभार्थी निवड करून हरभरा या पिकाची लागवड करणाऱ्या इच्छुक सर्व शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर हंगाम सुरू होण्यापूर्वी आवश्यक बियाण्याचा लाभ देण्यात येईल. शेतकऱ्यांनी मागणी अर्ज विहित नमुन्यात पंचायत समिती कार्यालयात सादर करावा. अर्जासमवेत स्वत:च्या, कुटुंबाच्या नावे असलेला सातबारा व आठ ‘अ’चे अद्ययावत उतारे सादर करावेत. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त एक हेक्टरसाठी बियाण्याचा लाभ देण्यात येईल. लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना दुबार लाभ दिला जाणार नाही.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

या योजनेसाठी आवश्यक बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, सातपूर, नाशिक या शासन अंगीकृत संस्थेकडून मंजूर दराप्रमाणे खरेदी करून पुरविण्यात येईल. ५० टक्के अनुदानावर हरभरा बियाणे देण्यात येईल. वजा जाता ५० टक्के वसूल करावयाची रक्कम गटस्तरावर बियाणे वाटप करण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल करून पुरवठा संस्थेच्या नावे डीडी/ धनादेश काढून या कार्यालयास पाठविण्यात येणार आहेत. त्यानुसार दर असे : हरभरा, २० किलो प्रति बॅग, २२६० रुपये दर, ११३० रुपये अनुदान, ११३० रुपये या दराने हरभरा बियाणे मिळेल. असेही जिल्हा कृषी विकास अधिकारी,नाशिक यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790