नाशिक। दि. ३ ऑक्टोबर २०२५: नाशिकरोड येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात तीन समाजकंटकांनी चार ठिकाणी चारचाकीच्या काचा फोडून पोलिसांसमोर पुन्हा थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकरोड येथे गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तीन संशयितांनी देवळालीगाव राजवाडा, धोंगडेनगर आणि डावखरवाडी परिसरात चार चारचाकींच्या काचा फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
परिसरातील एकूण चार वाहनांची तोडफोड झाली आहे. या चारही कुटुंबांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनांची पूजा करण्याचे नियोजन केलेले असताना तोडफोड झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उपनगर पोलिसांच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास तिघे टवाळखोर सर्रासपणे हत्यारे घेऊन फिरत नागरिकांच्या वाहनांच्या काचा फोडत असताना रात्र गस्तीच्या पोलिस पथकांना त्यांचा कुठलाही मागमूस लागला नाही, हे विशेष !.
नाशिकरोड परिसरात एमडी ड्रग्ज, गांजा, कुत्ता गोळी यांसारखे अमली पदार्थ मिळत असल्याने तरुणाई यामध्ये बरबाद होत आहे. तसेच जागोजागी टवाळखोर खुलेआम या अमली पदार्थांचे सेवन करताना सर्वसामान्य नागरिकांना दिसतात, मात्र पोलिसांना दिसत नाही. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गुन्हेगारी वाढलेली असून पोलिस याकडे कानाडोळा करीत असल्याचीही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
![]()

