नाशिक। दि. २६ ऑगस्ट २०२५: शहर व परिसरात हाणामारी करणे, अमली पदार्थ विक्री करणे, शस्त्राचा धाक दाखवून खंडणी उकळणे, हाणामारी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे तसेच दगडफेक करत दहशत पसरविणे, यांसारखे एकापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांना शहरासह जिल्ह्यातून पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी तडीपार केले आहे.
गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपायुक्तांना सराईतांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. अंबड पोलिस ठाणे हद्दीतील संशयित संदीप मारुती गायकवाड (२५, रा. लेखानगर) याच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल असून त्यास दोन वर्षांकरिता शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तसेच इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इरफान उर्फ चिपड्या शेख (३९, रा. सादिकनगर, वडाळा) याच्यावर देखील पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यालाही शहरासह जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे. आणि सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रेम गिते (२०, रा. श्रमिकनगर) यालाही दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस काळे यांनी दिली आहे.