नाशिक। दि. २२ जुलै २०२५: शहरात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचा आदेश देत किती खड्डे बुजविले याचाही अहवाल तयार करण्याच्या सूचना आयुक्त मनीषा खत्री यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत दिल्या, तसेच विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र ते साधुग्रामपर्यंत मुख्य गुरुत्ववाहिनी टाकणे, या कामाच्या प्रारूप निविदा दुरुस्ती करून दोन दिवसांत प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही दिल्या.
सोमवारी (दि. २१) महापालिकेत आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खत्री यांनी विविध विभागांचा आढावा देत कामकाजाबाबत सूचना दिल्यात. यावेळी अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, पाणीपुरवठा अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, यांत्रिकीचे अधीक्षक अविनाश धनाईत आदींची उपस्थिती होती.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मुकणे धरण पम्पिंग स्टेशन येथे पम्पिंग क्षमता वाढविणे, विल्होळी येथे २७४ द.ल.लि. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, तसेच विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र ते साधुग्रामपर्यंत मुख्य गुरुत्ववाहिनी टाकणे, या कामांच्या प्रारूप निविदा दुरुस्ती करून आयुक्तांच्या मान्यतेने दोन दिवसांत प्रसिद्ध कराव्यात. रुग्णालयांनी नोंदणी व नूतनीकरणासाठी ११८ अर्ज केलेले आहेत. ५८ रुग्णालयांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. ३६ रुग्णालयांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे, तसेच २४ रुग्णालयांची सद्यःस्थितीत पडताळणी सुरू आहे. यामध्ये कोणतीही प्रकरणे जास्त कालावधीसाठी प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता विभागाने घ्यावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.