नाशिक: गुजरातमधून नाशिकमध्ये तस्करी; साडेपाच लाखांचा गुटखा जप्त

नाशिक। दि. १६ जून २०२५: राज्यात गुटखाबंदी असल्यामुळे थेट गुजरातमधून पेठमार्गे नाशिक शहरात गुटख्याच्या तस्करीचा डाव गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने उधळून लावला. म्हसरूळजवळ संशयास्पद मालवाहू जीप रोखून झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ५ लाख ४५ हजार ६४४ रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनचालक संशयित वैभव सुनील क्षीरसागर (२५, रा. उमराळे, दिंडोरी) यास अटक केली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

गुजरातमधून नाशिकमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट-१चे अंमलदार मुख्तार शेख यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना कळविले. त्यांनी त्वरित पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना पथकासह सापळा लावण्याचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी त्वरित पेठरोडवरील तवलीफाटा परिसर गाठला. तेथे साध्या वेशात थांबून सापळा रचला. संशयास्पद जीप (एमएच१५ एफव्ही २७५१) येताच पोलिसांनी ही जीप रोखली. यावेळी चालकाला नाव, पत्ता विचारून जीपची झडती घेतली असता जीपमध्ये प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये गुटख्याची पाकिटे साठवणूक केलेली आढळली.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

याबाबत वैभव याच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता हा माल गुजरातच्या सुतारपाडा येथून नाशिकमध्ये पोहोचविण्यात येत होता, अशी त्याने कबुली दिली; मात्र गुटख्याचा साठा नाशिकमध्ये कोठे व कोण खरेदी करणार होते? याबाबतची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अधिक चौकशीसाठी म्हसरुळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here