विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल, नोंदणी व मुद्रांकसह भूमिअभिलेख विभागाचा घेतला आढावा

नाशिक दि. २४ मे २०२५: गौण खनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. पाणंद रस्ते मुक्त करीत शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज सकाळी मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, व उपविभागीय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा (नाशिक), डॉ. पंकज आशिया (अहिल्यानगर), आयुष प्रसाद (जळगाव), जितेंद्र पापळकर (धुळे), मिताली सेठी (नंदुरबार) उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते निफाड तालुक्यातील दोन लाभार्थ्यांना घरकूल बांधण्यासाठी वाळूच्या मोफत पासचे वितरण करण्यात आले.
तसेच 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात यशस्वी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यात उपविभागीय अधिकारी नितीन मुंडवारे (अमळनेर, जि. जळगाव), शरद मंडलिक (शिरपूर, जि. धुळे), आप्पासाहेब शिंदे (दिंडोरी, जि. नाशिक), तहसीलदार नानासाहेब आगळे (जामनेर, जि. जळगाव), अमोल मोरे (राहता, जि. अहिल्यानगर), महेंद्र माळी (शिरपूर, जि. धुळे) यांचा समावेश आहे.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प केला आहे. समाजाच्या शेवटच्या घटकासाठी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्व मिळून काम करावयाचे आहे. त्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. घरकुलांच्या बांधकामासाठी वाळूच्या उपलब्धतेसाठी आपापल्या जिल्ह्यातील नदी, नाल्यातील वाळूचे सर्वेक्षण करतानाच एम. सॅन्ड वाळूचे उत्पादन आणि वापरास प्रोत्साहन द्यावे.
आयुक्त डॉ. गेडाम यांनी महसूल विभागातर्फे नाशिक विभागात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. नाशिक विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागाची लोकसंख्या १ कोटी ९० लाख एवढी आहे. विभागाची महसूल वसुली १०७ टक्के झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया, श्री. शर्मा, श्रीमती सेठी, श्री. प्रसाद, पापळकर यांनी विविध सूचना केल्या
नोंदणी व मुद्रांक विभागाची बैठक:
मंत्री बावनकुळे यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा आढावा घेतला. नोंदणी महानिरिक्षक रवींद्र बिलवडे दुरुदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, दस्त नोंदणी अधिकाधिक सुलभ होईल, असे नियोजन करावे. जिल्हाधिकारी यांनी नोंदणी विभागाचा दरमहा आढावा घ्यावा. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने प्रमाण कार्यपद्धती तयार करावी. तसेच एक जिल्हा एक नोंदणीबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नोंदणी महानिरीक्षक कार्यालयांतर्गत स्नेहलता पाटील (दुय्यम निबंधक कार्यालय जळगाव क्र. २), सतीश कोकरे, दुय्यम निबंधक कार्यालय, सिन्नर, रुपेश चेनुकर, दुय्यम निबंधक कार्यालय,जळगाव क्र.३ यांचा मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भूमी अभिलेख विभागाची बैठक:
मंत्री बावनकुळे यांनी भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतला. यावेळी जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी आणि भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक महेश इंगळे यांनी विभागाची माहिती दिली. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, तक्रार रहित विभाग निर्मितीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. यावेळी पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी विविध सूचना केल्या.
१०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भूमी अभिलेख कार्यालयातील शीतल लेकुरवाळे (जामनेर), नंदा बहिरम (पेठ, जि. नाशिक), कुंदन परदेशी (साक्री) यांचा मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790