पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्रात हवामानाच्या स्थितीत लक्षणीय बदल दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत उष्णतेने त्रस्त असलेल्या राज्यातील नागरिकांना आता दिलासा मिळाला असून, प्री-मान्सून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात ढगाळ हवामान असून, काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता:
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, या भागांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला गेला आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘या’ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट:
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर (अहिल्यानगर), पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्यांनंतर विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट:
तर, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक तीव्रतेचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसासह प्रचंड विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, जळगावसह अन्य जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता:
दरम्यान, पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो.