नाशिक, दि. १० मे २०२५ (प्रतिनिधी): महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभांवर बसविलेल्या स्मार्ट सिटीच्या स्काडा वॉटर सिस्टिम तपासणीसाठी शनिवारी (दि. १०) दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी (दि. ११) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. दरम्यान, सरकारी रुग्णालय व आपत्कालीन परिस्थितीमध्ये १२ टँकर राखीव ठेवले जाणार आहे.
शहरातील ४० टक्के पाणी हिशेबबाह्य असून ही पाणी गळती किंवा पाणीचोरी याचा उलगडा झालेला नाही. जलकुंभापासून तर नागरिकांपर्यंत खरोखरच किती पाणी जाते हे तपासण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामधील विविध जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
शिवाय बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथील नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनची चाचणी स्मार्ट सिटी कंपनीकडून केली जाणार आहे. ही कामे करण्यासाठी गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, चेहेडी पंपिंग स्टेशन, मुकणे धरण पंपिंग स्टेशन बंद ठेवणे क्रमप्राप्त असणार आहे. तसेच मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे सबस्टेशनमधील विविध प्रतिबंधात्मक देखभालीची कामे केली जाणार आहेत.
![]()


