
नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाने सेवा हक्क कायदा लागू केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून विविध सेवा विहित कालावधीत देण्यात येतात. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरातून या सेवा कमी कालावधीत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी येथे व्यक्त केली.
सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (प्रशासन), बागलाणच्या उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी (सामान्य प्रशासन), राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक कार्यालयातील कक्ष अधिकारी उदय काण्णव आदी उपस्थित होते. यावेळी सेवा हक्क कायद्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल बागलाणच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती ठुबे, सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख आदींचा जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी शर्मा यांनी उपस्थितांना सेवा हक्क दिनानिमित्त शपथ दिली.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला. या अधिनियमानुसार विविध विभागांच्या ५८३ पेक्षा जास्त सेवा ऑनलाइन दिल्या जातात. या सेवा आणखी कमी कालावधीत देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. सेवा घेतल्यानंतर संबंधित नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात येणार आहेत. जेणेकरून या कायद्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल. ई सेवा केंद्र चालकांनी अद्ययावत राहत या सेवा विहित कालावधीत देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नागरिकांची सनद, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी हुलवळे म्हणाले की, शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अधिसूचित सेवा वेळेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क हा कायदा दहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. आता दरवर्षी २८ एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिवस म्हणून साजरा केला जाईल. ई सेवा केंद्र चालकांनी या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती करावी, असेही त्यांनी सेवा हक्क अधिनियमाचा सविस्तर आढावा सादर केला. तहसीलदार गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. अपर तहसीलदार अमोल निकम यांनी आभार मानले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, ई सेवा केंद्राचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790