नाशिक (प्रतिनिधी): रामनवमीचा उत्सव रविवारी (दि. ६) भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त शहर राममय झाले आहे.
श्री काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, अहिल्याराम मंदिर, बायकांचा राम मंदिर, पंचवटीतील मुठे यांचे राम मंदिर, रविवार कारंजा येथील श्री गोराराम मंदिर, भोंसला मिलिटरी स्कूल परिसरातील कोदंडधारी राम मंदिरासह सिडको, सातपूर, इंदिरानगर परिसरातील विविध मंदिरांत जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वत्र आनंद आणि चैतन्याचे वातावरण आहे.
विविध राम मंदिरांत फुलांची सजावट करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्री काळाराम मंदिरात दुपारी १२ वाजता जन्मोत्सव सोहळा होईल. तपोवनातील श्रीरामांच्या ७२ फूट उंच मूर्तीची सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होईल. नाशिकरोडमधील मुक्तिधाम येथे दुपारी ४ वाजता मिरवणूक, रात्री ८ वाजता महाआरती आणि सामुदायिक हनुमान चालिसा पठण करण्यात येईल.
श्री काळाराम मंदिरात दिवसभर कार्यक्रम:
श्री काळाराम मंदिर पहाटे ५ वाजता खुले होईल. पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी अभिषेक सोहळा पार पडल्यानंतर यंदाच्या उत्सवाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते आरती होईल. दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळा होईल. पंजिरी, श्रीखंडाचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. सायंकाळी ५६ भोग आणि रात्री ८ वाजता अन्नकोट सोहळा होईल.
![]()


