नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी गावाच्या शिवारातील दाढेगाव रस्त्यावर १९ फेब्रुवारी २०१९ साली चौघा जणांनी तीन अल्पवयीन गुन्हेगारांच्या मदतीने एका युवकावर शस्त्रांनी प्राणघातक हल्लाच चढवून गंभीर जखमी करत ठार मारल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी चौघा आरोपींना आजन्म कारावास व ४० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
दाढेगाव रस्त्यावर १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास रितेश अनिल पाईकराव (१९, रा. सुकदेवनगर, पाथर्डी) याच्यावर आरोपी उमेश कोंडीबा आव्हाड (१८), नरेश नाना दोंदे (१८), नयन सुरेश शिंदे (१९), अविनाश प्रल्हाद सावंत (१८) या चौघांनी त्यांच्या इतर तीन विधीसंघर्षित बालकांना सोबत घेऊन चाकू, चॉपर, गुप्ती व तलवारीने हल्ला केला होता. या प्रकरणी तत्कालीन उपनिरीक्षक आर.सी. शिंदे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत, आरोपींविरुद्ध न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता डॉ. सुधीर कोतवाल यांनी कामकाज केले.
![]()


