नाशिक (प्रतिनिधी): रिक्षाला कट लागल्याच्या कारणावरून रिक्षा चालक आणि त्याचा साथीदार स्विफ्ट कारमध्ये बसलेल्या कुटुंबाला दमदाटी केल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. याप्रकरणात आता पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी म्हणजेच १४ मार्च २०२५ ला दुपारी २ ते ३ च्या दरम्यान मारुती स्विफ्ट कार (क्रमांक: डी. एल. १२, सीएन २८२३) ह्या कारमधून एक कुटुंब लहान मुलांसह शालिमार येथून जात होते. त्यावेळी रिक्षाला (रिक्षा क्रमांक: एमएच १५, जेए ३५०४) कट लागल्याच्या कारणावरून रिक्षातील दोन युवकांनी कारचालकाला अडवून शिवीगाळ व दमदाटी करायला सुरुवात केली. यावेळी कारचालक वारंवार माफी मागत होता तसेच आजूबाजूचे लोकही रिक्षाचालकाची समजूत काढत होते. मात्र तो ऐकायला तयार नव्हता, असे व्हिडिओत दिसते.
या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन रिक्षाचालकाला शोधून काढले. यात पोलिसांतर्फे हवालदार विक्रांत नंदकिशोर मगर यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. मजहर अन्वर खान (रा. कथडा, भद्रकाली) आणि अरबाज रफिक शेख (रा. वडाळा गाव, नाशिक) अशी दोघा संशयितांची नावे आहे. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वसंत पवार करत आहेत. (भद्रकाली पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १००/२०२५)