नाशिक: जुन्या वादातून अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून करणाऱ्या टोळक्याला अटक

नाशिक (प्रतिनिधी): जुन्या वादातून कुरापत काढून संत कबीरनगरमध्ये शनिवारी (दि.८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून अरुण रामलू बंडी (वय १७, रा. कामगारनगर) यास ठार मारले होते. गंगापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने व गुन्हे शाखेच्या युनिट २ ने या टोळीतील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चौघा हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.

भोसला स्कूलमागे असलेल्या संत कबीरनगराच्या मुख्य रस्त्यावरून दुचाकीने जाणाऱ्या अरुण यास संशयित आरोपी समीर मुनीर सय्यद (वय: 29), जावेद सलीम सय्यद (वय: 32), विलास संतोष थाटे (वय: 18), करण उमेश चौरे (वय: 19) यांनी दोघा अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने अडविले. त्याच्यावर कोयता, रॉड, लोखंडी शिकंजा, बेसबॉलचा दंडुक्याने हल्ला चढविला होता.

हे ही वाचा:  नाशिक: स्वाधार योजनेच्या अर्जासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने अरुण जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यावेळी सर्वांनी येथून पळ काढला होता. गंगापूर पोलिस ठाण्यात सायलू रामलु बंडी (वय २०) याने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाला हल्लेखोरांचा शोध घेण्याची सूचना केली.

हे ही वाचा:  नाशिक: जुन्या भांडणावरून एकाला जबर मारहाण करणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने ठोकल्या बेडया

उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, शरद पाटील, गिरीष महाले, सोनू खाडे, मच्छिंद्र वाकचौरे, गोरख साळुंके आदींच्या पथकाने सलग तीन दिवस अहोरात्र शोध घेत चौघांना बेड्या ठोकल्या. अरुण हा मूळचा दक्षिण भारतातील असून त्याचे कुटुंब मोलमजुरीसाठी काही वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा:  नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान महत्वपूर्ण- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी:
संशयित विलास थाटे व करण चौरे या दोघांना सोमवारी गंगापूर पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने दोघांना येत्या गुरुवारपर्यंत (दि.१३) पोलिस कोठडी सुनावली. समीर व जावेद या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील दोघा विधिसंघर्षित बालकांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790