नाशिक (प्रतिनिधी): वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदीचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका इसमाची १ कोटी ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांच्याशी आरोपी अयन्ना जोसेफ, सेतुरत्नम रवी व व्हॉट्सअॅपवर खोटे संदेश पाठविणाऱ्या व्यक्तींनी वेळोवेळी संवाद साधला. सर्व आरोपींनी संगनमत करून आदित्य बिर्ला मनी लिमिटेड या कंपनीचे नाव वापरून बनावट इन्व्हेस्टमेंट अॅप तयार केले. त्यावर अर्जदार यांच्या नावाने वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करीत असल्याचे आमिष दाखवून अर्जदार यांना विविध बँक खात्यांमध्ये गुंतवणूक म्हणून ४१ लाख ६९ हजार ८५१ रुपयांची रक्कम अदा करण्यास भाग पाडली.
त्यानंतर अर्जदार यांनी ही रक्कम विथड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कॅपिटल गेन टॅक्स व सर्व्हिस टॅक्सबाबत आदित्य बिर्ला मनी लिमिटेडचे बनावट लेटरहेड असलेल्या नोटिसा फिर्यादी यांच्या ई-मेल व व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवून अनुक्रमे ८१ लाख ६१ हजार ८४७ व ७ लाख रुपयांची रक्कम भरावयास भाग पाडून त्यांनी एकूण १ कोटी ३८ लाख ९ हजार ८५१ रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान फिर्यादी यांच्या मोबाईलवरून राहत्या घरी व कार्यालयात घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सायबर भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.