नाशिक (प्रतिनिधी): घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि. ४) राहत्या घरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने वार करून खून केला. सविता छत्रगुण गोरे (वय ४५) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्री साडे अकराच्या सुमारास महिलेच्या पतीला अटक केली आहे.
गंगापूररोडवरील डी. के. नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास (बी-विंग) सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील गोरे दाम्पत्य हे मुलासह भाडेतत्त्वावर सदनिकेत राहत होते. मंगळवारी मुलगा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर हे पती-पत्नी घरात एकटेच होते. या घरातून दुसरीकडे स्थलांतर करायचे असल्याने संसारोपयोगी सामानाची आवरासावर सुरू असताना त्यांच्यात पुन्हा जोरदार भांडण होऊन ही घटना घडली.
संशयित छत्रगुण गोरे (५०) याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता व कूकरच्या झाकणाने जोरदार प्रहार केला. यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या. सोसायटीतील लोकांनी घटनेची माहिती पोलिसांनी कळविली. माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जुमडे, पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपूत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मुक्ता लिखे (रा. मयूरी सोसा, वॉचमन खोली, पंपिंग स्टेशन) हिने दिलेल्या फिर्यादीवरून छत्रगुण याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा सायंकाळी दाखल करण्यात आला. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २८/२०२५)
मुक्ता हिला गॅसची टाकी हवी असल्याने तिने आईला फोन केला होता. टाकी घेण्यासाठी ती स्वास्तिक इमारतीच्या पार्किंगमध्ये आली. यावेळी तिने पुन्हा आईला फोन केला असता आईने तिला चौथ्या मजल्यावरील घरी बोलाविले. ती वर गेली असता दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर तिचे वडील छत्रगुन यांनी दरवाजा उघडला असता आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये पडलेली आढळून आली. तोपर्यंत छत्रगुण हा फरार झाला होता. मुलीने शेजाऱ्यांचे दार वाजविल्याने रहिवाशांनी धाव घेतली. दरम्यान पोलिसांनी रात्री साडे अकराच्या सुमारास छत्रगुणला अटक केली आहे.