मनमाड-नाशिक-देवळाली रेल्वेमार्गावर ‘कवच 4.0’ प्रणाली मंजूर

नाशिक (प्रतिनिधी): राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून त्यांच्या विशेष प्रयत्नांतून मनमाड-नाशिक-देवळाली 79 कि. सेक्शनवर ‘कवच 4.0 प्रणाली’ मंजूर करण्यात आली आहे. या प्रणालीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या प्रणालीमुळे आगामी कुंभमेळ्याच्या काळात रेल्वेने येणार्‍या भाविकांच्या सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी खूप मोठा फायदा होणार आहे.

भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना या संदर्भात पत्र लिहून मागणी केली होती. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कवच ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित स्वदेशी विकसित ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली आहे, ज्यासाठी सर्वोच्च ऑर्डर सुरक्षा प्रमाणपत्र आवश्यक आहे. लोको पायलट तसे करण्यात अयशस्वी झाल्यास कवच हे लोको पायलटला विशिष्ट वेग मर्यादित ट्रेन चालवण्यास मदत करते आणि ट्रेनला खराब हवामानात सुरक्षितपणे धावण्यास मदत करते. या कवच प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक स्टेशन, ब्लॉक विभागात स्टेशन कवच बसवणे, ट्रॅकच्या संपूर्ण लांबीमध्ये टॅगची स्थापना करणे, संपूर्ण विभागात दूरसंचार टॉवरची स्थापना, ट्रॅकच्या बाजूने ऑप्टिकल फायबर केबल टाकणे, भारतीय रेल्वेवर धावणार्‍या प्रत्येक लोकोमोटिव्हवर लोको कवचची तरतूद करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून २४ लाखांना गंडा

कवच आवृत्ती 4.0 मध्ये विविध रेल्वे नेटवर्कसाठी आवश्यक असलेली सर्व प्रमुख वैशिष्ट्ये समाविष्ट असून भारतीय रेल्वेच्या सुरक्षेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आवृत्ती 4.0 मधील प्रमुख सुधारणांमध्ये वाढलेली स्थान अचूकता, मोठ्या आवारातील सिग्नल पैलूंची सुधारित माहिती, ओएफसी वर स्टेशन ते स्टेशन कवच इंटरफेस आणि विद्यमान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमचा थेट इंटरफेस समाविष्ट आहे.

हे ही वाचा:  नाशिक मनपाचा पुष्पोत्सव अखेर रद्द

रेल्वेकडून कवचच्या सुमारे 15 हजार किमीच्या ट्रॅक साइड कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. तसेच सर्व संबंधित अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या केंद्रीकृत प्रशिक्षण संस्थांमध्ये कवचचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. आतापर्यंत 9 हजारांहून अधिक तंत्रज्ञ, ऑपरेटर आणि अभियंते यांना कवच तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पोलिस आयुक्त आपल्या दारी; तक्रारींचे आवाहन

त्यानुसार मनमाड-नाशिक- देवळाली या 79 किमीच्या रेल्वेमार्गासाठी या कवच 4.0 प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेत मोठी भर पडणार असणार आहे. याचा फायदा आगामी 2027 मध्ये होऊ घातलेल्या नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान तर होणार आहे. त्याचबरोबर नंतरच्या काळातही नाशिक विभागातील रेल्वे प्रवाशांना सुरक्षित रेल्वे प्रवास कायमस्वरूपी अनुभवता येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790