नाशिक (प्रतिनिधी): रेल्वे रुळांवर दगड ठेवून पत्रा लावून रेल्वे प्रवाशांच्या जीवाला धोका व सरकारी मालमत्तेच्या नुकसानीच्या हेतूने कृत्य करणाऱ्या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
सोमवारी (दि.२३) नाशिकरोडकडून हरिद्वारकडे जाणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत १९१/९-११ रेल्वे रुळावर असलेला अडथळा दूरवरून बघितला अन् रेल्वेला ब्रेक लावल्यामुळे रेल्वे अडथळ्यावर जाऊन आदळण्यापूर्वीच थांबली. तरीसुद्धा रेल्वेच्या काही भागाचे नुकसान झाले.
रेल्वे रुळावर मोठा दगड व लोखंडी पत्र्याचा फलक आडवा ठेवण्यात आलेला आढळून आला. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरफुल सिंग यादव, आर. एन. सिंग, किशोर चौधरी, अंमलदार विशाल पाटील यांच्या पथकाने धाव घेत पाहणी करून पंचनामा नोंदविला. दरम्यान, याप्रकरणी तपास करत पोलिसांनी युवकास यास ताब्यात घेतले.
त्याची कसून चौकशी केली असता त्याची मानसिक आजाराची समस्या समोर आली. तो अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असल्याचे समजले. त्याच्यावर २०२१सालापासून मानसिक विकाराबाबत औषधोपचार सुरू असल्याची माहिती नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. त्याने या औषधोपचारामध्ये काही दिवसांपासून खंड पाडल्याचेही समजते.
याप्रकरणी रेल्वे विभागातील वरिष्ठ सेक्शन अभियंता अरुण शामसुंदर गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पंडित अहिरे हे करीत आहेत.