नाशिक (प्रतिनिधी): बँकेच्या एफडी विभागातून बोलत असल्याचे भासवत ‘एफडीवर व्याज जमा झाले आहे’, असे सांगत इंटरनेट बँकिंगद्वारे सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर भामट्यांनी ७ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, फोनवर कॉल आला. बँकेच्या एफडी विभागातून बोलतोय, असे सांगत ७ लाखांच्या एफडीवरील व्याजाची रक्कम जमा करण्याकरिता एफडी व बँक डिटेल फोनवर बोलणाऱ्याने घेतले. यानंतर या एफडीवर इंटरनेट बैंकिंगचा वापर करत ओव्हरड्राफ्ट घेऊन ७ लाखांची रक्कम काढून घेतली.
मे ते जुलै २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. सेवानिवृत्त अधिकाऱ्याने याबाबत बँकेत चौकशी केल्यानंतर त्यांची एफडी कोणीतरी काढून घेतल्याचे समजले. यानंतर त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली.