नाशिक (प्रतिनिधी): व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांना शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष देत महिला ब्रोकरकडून व्यावसायिकासह ३ जणांना ३६ लाख ५८ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, फ्रेंकीन टेम्पलेशन ऑनलाइन शेअर्स मार्केट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून प्रियंका यादव या महिलेने व्हॉट्सअॅप ग्रुपवर जॉईन केले. ऑनलाइन शेअर्स मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले. ग्रुपमधील इतर संशयित चेतन सेहगल, मीरा दास नितीन कामत, गिताका आनंद नावाच्या सदस्यांनी संगनमत करत शेअर्स मार्केटमधील काही कंपनीचे पोर्ट फोलिओची माहिती दिली. कशा प्रकारे नफा होतो याची ऑनलाइन माहिती दिली.
व्यावसायिकासह ग्रुपमधील अन्य तीन सदस्यांना विश्वास पटल्याने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. व्यावसायिकासह अन्य सदस्यांनी ३६ लाख ५८ हजारांची गुंतवणूक केली. दोन महिने होऊनही परतावा मिळत नसल्याने व्यावसायिकाने फोन केला. संशयितांनी कंपनीचे शेअर्स कोसळल्याचे सांगून दुसऱ्या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे समजताच पोलिसांत तक्रार केली. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख तपास करत आहे.