संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी बंद राहणार !

नाशिक (प्रतिनिधी): स्मार्ट सिटी कंपनी व मनपा पाणीपुरवठा वितरण विभागामार्फत मनपाचे विविध जलशुद्धीकरण केंद्रांवर विविध बूस्टर पंपिंग स्टेशन येथे फ्लोमीटर्स, व्हॉल्व्ह बसविणे आदी काम हाती घेण्यात आले असून, येत्या शनिवारी (दि. ३०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून, दुसऱ्या दिवशी रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथे एचटी पोल शिफ्ट करणे, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे फ्लोमीटर बसविणे, नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी फ्लोमीटर, व्हॉल्व्ह बसविणे, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे, बूस्टर पंपिंग स्टेशन येथे विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे, सातपूर विभागातील ९०० मि.मी. फीडर पाइपलाइनवरील जलकुंभावर व्हॉल्व्ह व वॉटर मीटर बसविणे, सातपूर प्रभाग क्र. ९ मधील कार्बन नाका संदीप प्लास्टिक वॉल कंपाउंडलगत शुद्ध पाण्याच्या ५०० मि.मी. पीएससी पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे, प्रभाग क्र. १० मधील भारत गॅस एजन्सीसमोर अशोकनगर येथे ९०० मि.मी. पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक येथील रॉ वॉटर पाइपलाइनची पाणी गळती बंद करणे व पाथर्डी फाटा येथील ६०० मि.मी. व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे, तसेच….

हे ही वाचा:  थंडीचा जोर ओसरला; राज्यात तीन दिवस पावसाची चिन्हे

कशिश हॉटेलजवळील ७०० मि.मी. पाइपलाइनवरील व्हॉल्व्ह लिकेज बंद करणे तसेच हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंदनगर टाकीच्या पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे, स्मार्ट सिटी कंपनीमार्फत वासननगर, राणीनगर, पाथर्डी फाटा येथील पाइपलाइनवर व्हॉल्व्ह बसविणे, नाशिक रोड विभागातील उपनगर इच्छामणी मंगल कार्यालयाजवळ संजय गांधीनगर रॉ वॉटर पाइपलाइन लिकेज बंद करणे, पवारवाडी जलकुंभ भरणारी ऊर्ध्ववाहिनी जेलरोड सिग्नलजवळ लिकेज बंद करणे आदी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. शनिवारी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहरास पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790