नाशिक (प्रतिनिधी): बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळ तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. आज (ता. २८) मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
तर उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका तीव्र होऊ लागला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालय निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे नीचांकी ८.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, पुणे आणि अहिल्यानगर येथे ९ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा कमी होत आहे. आज (ता. २८) आणि उद्या (ता. २९) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे येथे थंडीची लाट येणार असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे: धुळे ८.३, निफाड ८.३, परभणी (कृषी) विद्यापीठ ८.९, अहिल्यानगर ९.४, पुणे ९.९.