नाशिक (प्रतिनिधी): “मध्य नाशिक मतदार संघाच्या आमदार प्रा.देवयानी फरांदे यांचे पारडे जड असल्यामुळे त्यांची मते कमी करण्यासाठी विरोधक आता भर सभांमध्ये धादांत खोटी माहिती देत आहेत. ड्रग्ज प्रकरणातील कोणताही कथित आरोपी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील व्यासपीठावर नसताना देखील विरोधक जनतेची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवत आहेत. या अफवांमुळे विरोधकांचीच मते कमी होतील”, असा विश्वास स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शिवाजी गांगुर्डे पुढे म्हणाले की, प्रा. देवयानी फरांदे यांनी ड्रग प्रकरणाच्या खोलात जाऊन त्याचे पाळीमुळे उघडी केल्यामुळे विरोधकांना घाम फुटला आहे. विरोधकांमधील काही नेते ड्रग माफिया ललित पाटील याच्याशी जोडलेले आहेत. विशेष म्हणजे हे नेते आता वसंत गीते यांच्या व्यासपीठावर राजेरोसपणे फिरताना दिसत आहेत. या नेत्यांना वाचवण्यासाठी फरांदे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. विरोधक आपल्या सभांमध्येही जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती देत आहेत. ड्रग प्रकरणातील कथित आरोपी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर होता अशी धादांत खोटी माहिती विविध सभांमधून दिली जात आहे.
यात तथ्य असते तर कोणत्याही माध्यमाच्या कॅमेरामध्ये संबंधित व्यक्ती का दिसू नये? संपूर्ण जगाने नरेंद्र मोदी यांची सभा बघितली आहे. त्यात संबंधित व्यक्ती कुणालाच कशी दिसली नाही? यावरूनच विरोधकांनी आता किती पातळी सोडून आरोप करत आहेत हे लक्षात येते. वास्तविक ड्रग माफिया ललित पाटील याच्याशी कोणाचे संबंध होते हे नाशिककरांना माहित आहे. काही दिवसात याविषयी आणखी काही गौप्यस्फोट फरांदे यांच्याकडून केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील कारवाई टाळण्यासाठी आता फरांदेंनाच या प्रकरणात गोवण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु जनता अशा खोट्या आरोपांना भीक घालणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.