नाशिक (प्रतिनिधी): अगोदर ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणूक जिंकून देण्याचे आमिष दाखवले, त्या बदल्यात ४२ लाख रूपये मागितले.. मात्र पैसे देण्यास नकार देताच ईव्हीएम मशीन हॅक करून तुमचा पराभव करू अशी धमकी देण्यात आली. हा प्रकार घडला आहे नाशिकमध्ये ! याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने एका इसमास अटक केली आहे.
याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा अधिकृत उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचाराचे काम बघणारे आनंद पांडुरंग शिरसाठ यांनी पोलिसांकडे लेखी फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर २०२४) दुपारी बारा वाजेच्या सुमारास भगवानसिंग चव्हाण हा इसम प्रचार कार्यालयात आला. त्याने “मी तुम्हाला ई.व्हि.एम मशिन हॅक करून १० केलेल्या मतदानापैकी ३ ते ४ मते हे तुम्हाला मिळवुन देवुन निवडणुकीमध्ये जिंकुन देईल” असे अमिष दाखवुन त्या बदल्यात ४२ लाख रूपये लागतील असे सांगुन त्यापैकी ०५ लाख रूपये आता दयावे अशी मागणी केली. त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने “पैसे न दिल्यास निवडणुकीचे प्रोग्रामिंग करणारे माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्या मदतीने ई.व्हि.एम मशिन हॅक करून तुमचा उमेदवार वसंत गिते यांना निवडणुकीमध्ये पराभुत करेन” अशी धमकी दिली.
त्यानंतर शिरसाठ यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकारचा तपास गुन्हे शाखा युनिट १ कडे वर्ग केला. गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व पोलीस अधिकारी, अंमलदार हे गुन्हयाचा तपास करीत असतांना आरोपी हा मखमलाबाद नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळताच त्याला शिताफीने पकडले. त्याने त्याचे नाव भगवानसिंग नारायण चव्हाण, (वय-३४वर्षे, मुळ राहणार: प्लॉट नं ५ विनायक कॉलनी एम.डी.एस युनिव्हरसिटी जवळ, गोगरा, अजमेर (राज्य: राजस्थान) हल्ली राहणार: एरिगेशन कॉलनी समोर, विठु माउली कॉलनी, मखमलाबाद म्हसरूळ लिंकरोड, नाशिक) असे असल्याचे सांगुन त्याने वरील प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपी हा अजमेर राजस्थान येथील राहणार असुन तो नाशिक शहरामध्ये सुमारे १५ ते २० दिवसापुर्वी नाशिक येथे मार्बलचे कामकाज करण्यासाठी आला असता त्यास निवडणुकीची संधी साधुन पैसे कमविण्याची कल्पना सुचल्याने त्याने सदरचा प्रकार केला असल्याचे त्याने सांगितले. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हेशाखा युनिट क्रमांक १, नाशिक शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, शरद सोनवणे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, रोहिदास लिलके, रमेश कोळी, कैलास चव्हाण, योगीराज गायकवाड, विशाल काठे, जगेश्वर बोरसे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ यांनी केली आहे.