नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात जे युवा मतदार यावर्षी प्रथम मतदार नोंदणीद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यांनी मतदान झाल्यानंतर तर्जनीस लावलेल्या शाईचा सेल्फी सोशल मिडियावरून आपल्या सहकारी मित्र-मैत्रिणींना पाठवून त्यांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानासाठी जिल्हा प्रशासनाकडून या निवडणुकीसाठी विविध साहित्य, आवश्यक बाबी याची जुळवाजुळव, वाहतूक इत्यादी तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. निवडणूक साहित्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे ” न पुसता येणारी शाई अर्थातच … Indelible Ink …… म्हणजेच अमिट स्याही…. ”
निवडणुकीच्या वेळी मतदान करताना मतदान अधिकारी मतदाराच्या बोटास विशिष्ट प्रकारची शाई लावत ही शाई मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला लावली जाते. शाई कुठल्या बोटाला लावावी , ती कशी लावा़वी , केंद्रावरील कोणत्या अधिका-याने लावावी याबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. ही शाई बोटाला लावल्यावर थोड्याच वेळात सुकते आणि साधारण काही आठवडे तशीच राहते. याचा उपयोग मुख्यत्वे मतदारांनी मतदान केले आहे आणि तो दुबार मतदानासाठी येणार नाही याची खात्री करण्यासाठीच करण्यात येतो. यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकून रहण्यास मदत होते.
भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार सन 1962 च्या सर्वसाधारण निवडणुकीपासून ही शाई वापरली जाते. आता म्हैसूर पेन्ट्सकडून या शाईचे उत्पादन केले जाते. मात्र, याआधी वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अर्थातच सीएसआयआर ने ही पक्की शाई तयार केली होती. न पुसता येणारी शाई तयार करण्याचा आयोगाचा विशिष्ट फॅार्म्युला आहे.त्यानुसारच शाई तयार करण्यात येते. न पुसता येणारी ही शाई शेजारच्या कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील म्हैसूर पेन्ट्स आणि वॅार्निश लिमिटेड या कंपनीकडून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तयार केली जाते. येथूनच देशातील सर्व राज्यातील जिल्हा निवडणूक कार्यालयांना मागणीनुसार या शाईचा पुरवठा करण्यात येतो. ही कंपनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या शाईची निर्यात देखील 30 पेक्षा जास्त देशांना करते.
सुरुवातीला ही शाई फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकरीता वापरत असत. आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका / सहकारी संस्थांच्या निवडणूकांसाठी देखील ही शाई वापरली जाते. साधारण 80 सीसीच्या छोट्या बॅाटलमध्ये ही शाई पाठविण्यात येते. एका बॅाटलमधून साधारणत: 800 मतदारांना शाई लावता येते. प्रत्येक मतदान केंद्रावर तेथील मतदार संख्येनुसार आवश्यक तितक्या बॅाटल साहित्यासोबत पुरवल्या जातात.
मतदान केंद्रावर ही पक्की शाई अर्थातच Indelible Ink लावण्यासाठी एका मतदान अधिकाऱ्यांकडे काम सोपविले जाते. आयोगाच्या निर्देशानुसार सदर शाई मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावण्यात येते. जर मतदार दिव्यांग असेल त्यास डाव्या हाताचे बोट नसेल किंवा कदाचित डावा हातच नसेल, तर अशा वेळी ही शाई कशी लावावी याबाबत आयोगाच्या स्पष्ट आणि सविस्तर सूचना आहेत. मतदान अधिका-यांना प्रशिक्षणाच्या वेळी याबाबत सूचना देण्यात येतात. मतदान अधिकारी आयोगाच्या निर्देशानुसार सदर कार्यवाही करत असतात.