नाशिक (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथून नाशिकला देवदर्शनासाठी तपोवनात केवडीबन स्वामीनारायण मंदिर येथे आलेल्या महिलेच्या चारचाकी वाहनाची काच फोडून रोकड, तसेच आधार कार्ड व इतर वस्तू चोरून नेल्याची घटना काल शनिवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमाराला घडली.
या चोरीप्रकरणी अंजली मंजुनाथ वर्ती यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शुक्रवारी सायंकाळी वर्ती व त्यांच्या सहकारी
तपोवन येथील केवडीबनात असलेल्या स्वामीनारायण मंदिरात देवदर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कार (एम.एच.१४ जीएच ८४०७) कन्नमवार पुलाखाली उभी केली असताना अज्ञात व्यक्तीने कारची मागील काच फोडली. कारमध्ये ठेवलेले आधार कार्ड व विविध खेळांचे प्रमाणपत्र पदके आणि रोख रक्कम असा ३४ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीदेखील स्वामीनारायण मंदिर परिसरात उभे केलेल्या वाहनाची काच फोडून चोरी झाल्याची घटना घडली होती.