नाशिक (प्रतिनिधी): सहा वर्षांपासून आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत तोतयाने एका व्यावसायिकाला तब्बल एक कोटींचा गंडा घातला आहे.
तोतया आयपीएस अधिकाऱ्याने एका व्यवसायिकाला १ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
दरम्यान, आरोपीने बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे बनावट कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपीने पीडित व्यवसायिकांना रिवॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी विठ्ठल सखाराम वाकडे (५६, रा. राणे नगर) यांनी अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी गौरव रामअछेश्वर मिश्रा (३७, रा. कामटवाडे) याने २०१८ साली वाकडे त्यांच्याशी ओळख केली. मिश्रा हा स्वतःला भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असल्याचे भासवत होता. तो नेहमी पोलिस गणवेश परिधान करून, अंबर व लाल रंगाच्या दिवे असलेल्या गाडीतून फिरत असायता. त्याने आपल्याकडे शासनाने दिलेले सुरक्षा रक्षक असल्याचे दाखवून वाकडे यांचा विश्वास संपादन केला. मिश्रा याने वाकडे यांना रेल्वेचे कंत्राट ओळख वापरून मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून रक्कम घेत तब्बल १ कोटी ७ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम उकळली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला रविवारी (दि. २७ ऑक्टोबर २०२४) अटक केली आहे.
लाल दिव्याचे वाहन, गणवेशाचाही वापर:
मिश्रा पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश घालून रेल्वे महानिरीक्षक आणि आयपीएसचे बनावट ओळखपत्र घेऊन फिरायचा. वाहनावर लाल दिवा, एक सुरक्षा रक्षक ठेवून २०१८ ते २०२४ असे सात वर्ष तो वावरत होता. रेल्वेमध्ये महानिरीक्षक असल्याचे भासवत तो टेंडर घेत होता.
पाथर्डीफाट्यावर गुंडांना बोलावून धमकावले:
रेल्वे डेपो येथे गाड्यांचा पुरवठा, सिक्युरिटी डिपॉझिट, गाड्यांचा खर्च अशा विविध कारणांसाठी पैसे देण्यात आले. मात्र, कालांतराने वाकडे यांना मिश्राच्या बनावटीची जाणीव झाली. त्यांनी मिश्राकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता तो त्यांना टाळाटाळ करू लागला. दि.१३ ऑक्टोबर २०२४ रोजी मिश्राने वाकडे यांना पाथर्डी फाटा, नाशिक येथे भेटण्यासाठी बोलावले. तेथे दहा ते बारा गुंडांना सोबत घेऊन आलेल्या मिश्राने वाकडे यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकी दिली. त्याने वाकडे यांना पैसे विसरून जाण्यास सांगितले. तसेच, त्यांच्याकडून दरमहा ५ लाख रुपये खंडणी मागितली, असे फिर्यादीत म्हटले आहे.