नाशिक (प्रतिनिधी): आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मानूर गावात राहत्या घराच्या खोलीत गांजा विक्री करण्याच्या इराद्याने बेकायदेशीर गांजा साठवणूक करणाऱ्या दोघा पिता पुत्रांवर आडगाव पोलिसांनी कारवाई केली. आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि.११) मध्यरात्री छापा टाकून अंदाजे सव्वा तीन लाख रुपये किमतीचा ३२ किलो ग्रॅम गांजा जप्त केला.
बेकायदेशीर गांजा साठवण करून विक्री करण्यासाठी जवळ बाळगल्या प्रकरणी मंगेश राठोड (२५) व त्र्यंबक राठोड (५५) या दोघा पिता पुत्रांवर एनडीपीएस कलम नुसार आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आडगाव शिवारातील मानूर गावात राहत असलेले राठोड पिता पुत्र गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीररित्या गांजा साठवण करत विक्री करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन खैरनार यांना मिळाली होती. याप्रकरणी आडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २९१/२०२४)