नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी गावात जुन्या वादातून एका युवकाचा सहा जणांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील आरोपींना अवघ्या तासाभरात अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नटेश विजय साळवे (वय: २०, रा.विल्होळी,ता.नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.काल (दि.२२ सप्टेंबर) रोजी रात्री नटेश हा पाथर्डी गावातील काजी मंजिल इमारतीसमोरून जात असताना त्याला सहा जणांनी अडविले. यावेळी त्यांनी जुन्या वादातून नटेशवर धारदार शस्त्रांनी वार करत त्याचा जागीच खून केला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मयताचे नातेवाईक शशिकांत गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. सादर संशयित आरोपी हे गौळाणे परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचत दुर्गेश दिपक शार्दूल (वय: २३), आयुष उर्फ यश विजय दोंदे (वय: १९), रोहित रामदास वाघ (वय: २०), गौरव रवींद्र दोंदे (वय: १९) करण पंकज भांबळ (वय: २०) आणि प्रफुल्ल अमोल दोंदे (वय: २०, सर्व राहणार पाथर्डी गाव) या सहा आरोपींना एका तासाच्या आत अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.