नाशिक (प्रतिनिधी): शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये मूळ मालकांअभावी शेकडो बेवारस वाहने पडून आहेत. या बेवारस वाहनांच्या मूळ मालकांना शोधून त्यांना त्यांची वाहने परत करण्यासंदर्भातील मोहीम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकारातुन घेण्यात आली असून, त्यानुसार वाहतूक शाखा आणि पुण्यातील गंगामाता वाहन शोध संस्थेने ३८ बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेतला आहे.
पोलीस आयुक्तालयातील जवळपास साऱ्याच पोलीस ठाण्यांमध्ये शेकडो बेवारस वाहने विविध कारणांनी वा गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली असतात. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया, आणि बेवारस वाहनाचे मालक वाहने नेण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे शेकडो वाहने वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात पडून आहेत. अशा, बेवारस वाहनांच्या मालकाचा शोध घेण्यासाठी, ती वाहने मूळ मालकाच्या ताब्यात देण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेश दिले होते. त्यानुसार मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुधाकर सुराडकर, नाशिकरोड युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बेवारस वाहनाच्या मालकांचा शोध सुरू करण्यात आला.
बेवारस वाहनांच्या मूळ मालकाचा शोध घेण्यासाठी शहर पोलीसांनी परंदवाडी (जि. पुणे) येथील गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांची मदत मिळाली. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांची पाहणी करीत, वाहनाचा चेसीज नंबर, इंजिन क्रमाकांवरुन ३८ वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावला. यात, २१ दुचाकी, १७ रिक्षांचा समावेश आहे.
ही बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत, त्यांनी कागदपत्रे दाखवून सात दिवसाच्या आत घेऊन जावेत अन्यथा त्या वाहनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विल्हेवाट लावली जाणार आहे. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक तांबे, पोलीस नाईक सुनिल पाचरणे, कैलास निबेंकर, महिला अंमलदार सुरेखा दळवी यांच्यासह राम उदावंत, बाळासाहेब बागडे, भारत वाघ यांनी यासाठी परिश्रम घेतले.