नाशिक: लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची मारहाण करत लूटमार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथे संशयित युवकाला दुचाकीवरून लिफ्ट देणे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच भोवले आहे. संशयिताने अंधारात नेऊन त्यांना दगडाने मारहाण करून त्यांच्याकडील दागिने, मोबाईल व मोपेड हिसकावून पोबारा केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिसात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 जून पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

ॲन्थोनी गॅब्रियल साळवे (वय: ६५, रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास ते आपल्या ॲक्टिवा मोपेडवरून (एमएच १५ इएम ६३३१) सेट अण्णा चर्च येथून घराकडे जात होते. त्यावेळी संशयित युवकाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. त्यांनी संशयिताला बसवून निघाले असता, संशयिताने त्यांना क्रोमा शोरुमजवळील मोकळ्या जागेकडे घेऊन गेला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नवीन घाटांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करावीत- पालक सचिव एकनाथ डवले

त्याठिकाणी गेल्यानंतर संशयिताने साळवे यांना दगडाने मारहाण केली. त्यानंतर संशयिताने त्याच्या मित्राला फोन करून बोलावून घेतले. दोघांनी साळवे यांना मारहाण करून त्यांच्या हातातील ३० हजाराची सोन्याची अंगठी, चांदीची अंगठी, ५ हजारांचा मोबाईल, १५ हजारांची मोपेड व एटीएम कार्ड असा ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून साळवे यांचीच मोपेडवरून पसार झाले. याप्रकरणी उपनगर पोलिसात मारहाणीसह लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक पवार हे तपास करीत आहेत. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७८/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790