नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कुठलेही कारण नसतांना रिक्षातील टोळक्याने दुचाकीस्वारास बेदम मारहाण केल्याची घटना आर्टिलरी सेंटर रोडवरील हरीओमनगर भागात घडली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास तानाजी सहाणे (३८ रा.हरिकृष्ण अपा.फेस ३ हरिओमनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सहाणे गेल्या शनिवारी (दि.१५) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथून हरिओमनगरच्या दिशेने जात असतांना ही घटना घडली. मोपेड दुचाकीवर ( एमएच १५ डीएच ८१४३) ते प्रवास करीत असतांना हरिओमनगर परिसरात रिक्षातून आलेल्या तीन ते चार जणांच्या अज्ञात टोळक्याने त्यांची वाट अडविली.
यावेळी कुठलेही कारण नसतांना संशयितांनी शिवीगाळ करीत सहाणे यांना मारहाण केली. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करीत सहाणे यांची दुचाकीही भामट्यांनी फोडून टाकली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करीत आहेत.
![]()

