नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दिवाणी प्रकरण जमा करण्यापूर्वी तक्रारदार हे त्यांचे प्रकरण कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून मिळण्यासाठी गेले असता, त्या मोबदल्यात जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षकाला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. ९) दुपारी सदरची कारवाई केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाणी न्यायालयाचे सहायक अधीक्षक मनोज दत्तात्रय मंडाले असे लाचखोराचे नाव आहे.
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या संमतीशिवाय शेतीचे केलेले खरेदीखत रद्द करण्याचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करायचा होता. सदरचा दावा दाखल करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो.
कोर्ट फी स्टॅम्प रक्कम भरल्यानंतर सदरचे प्रकरण मंडाले याच्याकडे जमा करावे लागते. परंतु सदरची कोर्ट फी स्टॅम्प रक्कम प्रकरण जमा करण्यापूर्वी मंडाले याचेकडून काढून न घेतल्यास ते सदर प्रकरणात त्रुटी काढतात.
त्यामुळे सदर प्रकरण जमा करण्यापुर्वी तक्रारदार हे त्यांचे प्रकरण कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून मिळण्यासाठी मंडालेकडे गेले असता त्या मोबदल्यात व सदर प्रकरणात सहकार्य करण्यासाठी मंडाले याने बुधवारी (ता.८) तक्रारदाराकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, विभागाने पडताळणी करून गुरुवारी (ता.९) दुपारी लाच स्वीकारताना मंडाले यास अटक केली. सदरची कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके यांनी बजावली.