नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकारी करत खंडणी वसुली करून कर्जदारांची मालमत्ता हडप करणारा संशयित वैभव देवरे यास इंदिरानगर पोलिसांनी तिसऱ्या गुन्ह्यात शनिवारी (दि. ४) अटक केली. देवरे याचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी फेटाळून लावला होता. यामुळे त्याने अपिलात जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांच्या न्यायालयात देवरेच्या अर्जावर सुनावणी झाली. शनिवारी (दि. ४) सत्र न्यायालयानेही त्याचा अर्ज फेटाळून लावला आहे.
इंदिरानगर पोलिस ठाण्यात पाच कर्जदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचे एकूण पाच, तर विनयभंगाचे एक असे सहा गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, एका कर्जदार महिला फिर्यादीसोबत मोबाइलवरून शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तसेच विनापरवाना कर्ज वाटप करत सावकारी करून कर्जदारांकडून मुद्दल व व्याजाच्या रकमेची बळजबरीने वसुली करत मालमत्ता हडपल्याचा आरोप आहे.
एका फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांना अद्याप सहा लाख रुपयांची वसुलीसुद्धा करावयाची असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाकडून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत जामीन अर्ज फेटाळला होता. यामुळे देवरे याने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालय क्रमांक ३ मध्ये या अर्जावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण करण्यात आली होती.
👉 न्यायालयाने शनिवारी याबाबत आदेश देत जामीन अर्ज फेटाळला. यानंतर इंदिरानगर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी पोलिस उपनिरीक्षक भूषण सोनार, सागर परदेशी, योगेश जाधव यांच्या पथकाला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवाना केले.
👉 पथकाने तेथून वैभव देवरे याचा ताबा घेत इंदिरानगर पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे.
👉 या गुन्ह्यात त्याच्यावर विविध कलमांनुसार फसवणूक, खंडणी वसुलीसाठी धमकावणे आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.