नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
मध्यरात्रीनंतर शहरामध्ये पावसाची हजेरी
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये मंगळवारी (दि.१६) या हंगामातील उच्चांकी ४०.७ तापमान नोंदवले गेले. मालेगावी पारा ४२.६ अंशावर होता. राज्यात भुसावळला उच्चांकी ४३.८ तापमान नोंदवले गेले.
राज्यातील १९ शहरांतील पारा चाळिशीपार गेला होता. नाशिकमध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा शिडकावा झाला. दरम्यान, नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
विदर्भ ते कर्नाटकपर्यंत खालील वातावरणात वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झाल्याने राज्यातील वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. मराठवाड्यात पावसाचा अंदाज, मुंबईत उष्ण लाट आगामी दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्णतेची लाट राहील, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये तापमानात वाढ होईल, विदर्भ, मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे.