नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बनावट कागदपत्रे ई-मेल द्वारे पाठवून पेट्रोलपंप मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तीने 46 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संतोष चंद्रकांत कटारे (वय 47, रा. गोसावीवाडी, नाशिकरोड) हे किराणा व्यावसायिक आहे. त्यांना वेगवेगळे नावे सांगणार्या अनोळखी व्यक्तींनी ई-मेल द्वारे, फोनद्वारे व व्हॉट्स अॅपद्वारे संपर्क साधून आम्ही इंडियन ऑईल या कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. 23 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत या तोतया अधिकार्यांनी फिर्यादी कटारे यांना इंडियन ऑईल या कंपनीचे बनावट कागदपत्रे ई-मेलद्वारे पाठवून पेट्रोलपंप मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी कटारे यांनी तोतया अधिकार्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी 46 लाख 44 हजार 625 रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार कटारे यांनी अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम जमा केली; मात्र त्यानंतर पेट्रोलपंपाबाबत विचारणा केली असता संबंधित तोतया अधिकार्यांनी दुरुत्तरे दिली.
यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.