नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अंबड लिंकरोड परिसरातील आशीर्वादनगरमध्ये एकाचा दोरीने गळा आवळून पंख्या लटकावून ठार मारल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप व १८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या गुन्ह्यातील अन्य तिघांची जिल्हा न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सदरची घटना २०१९ मध्ये घडली होती.
गोपाल शेखर कुमावत (३२, रा. पांडुरंग कृपा रो हाऊस, आशीर्वादनगर, अंबड-सातपूर लिंकरोड) असे जन्मठेप सुनावण्यात अलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, रमेश दगा वानखेडे यांना आरोपीने ठार मारले होते.
२९ ऑक्टोबर २०१९ रोजी मयत रमेश वानखेडे हा आरोपी गोपाल कुमावत याच्या पत्नीला इशारे करतो या कारणावरून गोपाल कुमावत याच्यासह शेखर बंडू कुमावत (रा. साईश्रद्धा रो हाऊस, आशीर्वादनगर), शुभम शेखर कुमावत (१९), लखन शेखर कुमावत यांनी मयत रमेश यास घराबाहेर बोलावून बेदम मारहाण केली.
यावेळी नागरिकांनी सोडवून केल्यानंतर आरोपीने काही वेळांनी मयत रमेश याच्या घराच्या टेरेसवर गेला आणि त्याने रमेशचा दोरीने गळा आवळून त्यास ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यास घरातील पंख्याला लटकावले. याप्रकरणी अंबड पोलिसात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक एम.डी. म्हात्रे यांनी करीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सदरचा खटला जिल्हा प्रधान न्यायधीश एस.डी. जगमलानी यांच्यासमोर चालला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. शिरीष कडवे यांनी कामकाज पाहिले.
आरोपी गोपालविरोधातील पुरावे सिदध झाल्याने न्यायालयाने त्यास जन्मठेप व १८ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली तर, उर्त्तरित तिघांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार संजय शिंदे, सहायक उपनिरीक्षक अण्णा कुवर यांनी पाठपुरावा केला.