पोलिसांच्या ताब्यात, सोने खरेदी करणाऱ्या सराफाला अटक
नाशिक (प्रतिनिधी): मैत्रिणीवर खर्च करण्यासाठी, तसेच महागडे मोबाइल वापरण्यासाठी सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने त्रिमूर्ती चौक, सिडको परिसरात ही कारवाई केली. दरम्यान, या दोघांकडून चोरीचे सोने घेणाऱ्या सराफालादेखील पथकाने ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पथकाचे प्रशांत मरकड यांना माहिती मिळाली. दोन संशयित हे त्रिमूर्ती चौक येथील असल्याचे समजले. पथकाने परिसरात सापळा रचला. दोन संशयित दुचाकीवरून येताना दिसले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पलायन केले. थोड्याच अंतरावर दोघांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.
निर्जनस्थळी लूटमार:
दोघे संशयित बारावीत शिक्षण घेतात. दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. कॉलेजमध्ये मैत्रिणींवर पैसे खर्च करण्यासाठी ते दुचाकीची नंबरप्लेट काढून ठेवायचे आणि आडगाव, म्हसरुळ परिसरात निर्जनस्थळी एकट्या महिलांना लक्ष करत चोरी करायचे. त्यांनी आतापर्यंत ६ मंगळसूत्रे चोरी केल्याची कबुली दिली.
चौकशीत दोघे अल्पवयीन असल्याचे समजले. पथकाने सखोल चौकशी केली असता आडगाव, म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकट्या महिलांना लक्ष करत सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, रवींद्र बागूल, संदीप भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली. चोरी केलेली सोनसाखळी आईची असल्याचे सांगत हे दोघे सराफाला कमी किमतीत सोने विक्री करायचे. पथकाने या सराफालाही ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या आधारे पथकाने संशयितांच्या पेहरावाचे निरीक्षण केले. त्यानंतर गेट अॅनालिसीस प्रणालीच्या आधारे अल्पवयीनांचा माग काढत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.