नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
पावडर हाती देत चोरटे झाले पसार…
नाशिक (प्रतिनिधी): तांबे, पितळ व सोन्याचे दागिने चमकविण्याची पावडर हाती देत पॉलिश करण्याचा बहाणा करून एका ज्येष्ठ महिलेकडून १ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून घेत पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुलनगर येथील तुलसी निवास बाहेर वयोवृद्ध तुळसाबाई सखाराम शेजवळ (६०) या ११ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर ओट्यावर बसल्या होत्या. यावेळी दोन अनोळखी युवक तुळसाबाई यांच्याकडे आले व आमच्याकडे तांबे, पितळेची भांडी व सोन्याचे दागिने चमकविण्याची पावडर असल्याचे सांगितले.
दोघा भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुळसाबाई यांनी घरातून तांब्याचा लोटा आणून दिला असता, त्या दोघा भामट्यांनी पांढरी पावडर लावून तो तांब्याचा लोटा चमकवून दिला.
यावेळी तुळसाबाई यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाचे १ लाख १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व सोन्याचा गोफ चमकवून देतो, असे सांगून एका भामट्याने तुळसाबाई यांनी गळ्यातून काढलेले दागिने आपल्याजवळ घेतले. यावेळी बाहेर उभ्या असलेल्या सहकाऱ्याकडून पावडर घेऊन येतो, असे सांगून दोघेही भामटे दागिने घेऊन पसार झाले.