नाशिक (प्रतिनिधी): प्रिपेड टास्क पुर्ण करुन त्या बदल्यात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका तरुणास दोन भामट्यांनी साडे अकरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवम दयानंद सूर्यवंशी (वय 21, रा. ताज हेरीटेज, कृष्णाईनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, दि. 30 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकधारक व टेलिग्रामधारक यांनी सूर्यवंशी यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला.
त्यांनी सूर्यवंशी व त्यांच्या मित्रांना टेलिग्रामच्या माध्यमातून प्रिपेड टास्क पूर्ण करुन त्या बदल्यात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर संशयितांनी दिलेल्या आमिषावर फिर्यादी सूर्यवंशी याचा विश्वास बसला.
त्यानंतर आरोपींनी जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत फिर्यादी सूर्यवंशी, अंकिता रॉय आणि मिथून अशोक दाते यांच्याकडून अनुक्रमे 5 लाख 16 हजार रुपये, 3 लाख 24 हजार रुपये व 3 लाख 3 हजार रुपये अशी एकूण 11 लाख 43 हजार रुपयांची रक्कम अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकधारक, टेलिग्रामधारक व आयसीआयसीआय, एचडीएफसी या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितले.
त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी ही रक्कम जमा केली. मात्र ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवूनही फायदा होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर ही फसवणुकीची बाब उघड झाली.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहे.