शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा: पालकमंत्री

नाशिक (प्रतिनिधी): सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

आज 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते.

पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, भारतीय प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्षाची सुरूवात नुकतीच उपराष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आली. हे प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजरे करतांना युवकांचे सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यावर भर देत असून या सक्षम युवांच्या माध्यमातून समर्थ भारत घडविण्याचा व देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या मार्गावर आपण वाटचाल करीत आहोत. यासोबतच बळीराजासाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत 2023-24 या वर्षाच्या खरीप हंगामात केवळ एक रुपयात पिक विमा जाहिर केला. या योजनेत जिल्ह्यातील पाच लाख 88 हजार 648 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगाम 2023 मध्ये प्रतिकुल परिस्थितीत अधिसूचना काढून आतापर्यंत एक लाख 37 हजार 317 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 64.88 कोटी रुपये जमा केले आहेत. तसेच पीएम किसान योजने अतंर्गत जिल्ह्यातील तीन लाख 92 हजार 866 शेतकऱ्यांना 92.79 कोटींचा 15 वा हप्ता वाटप करण्यात आला असून 16 व्या हप्त्यासाठी चार लाख 6 हजार 720 लाभार्थी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याचे ही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

शासनाने ई- हक्क प्रणालीच्या माध्यमातून 11 प्रकारच्या नोंदी 7/12 वर घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे अनिवार्य असून या प्रणालीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. त्याचप्रमाणे भूमी अभिलेखांचे संगणकीकरण कार्यक्रमा अंतर्गत 7/12, फेरफार व जन्म मृत्यू नोंदी इ. अभिलेख नागरिकांना ऑनलाईन पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असून नाशिक महसूल विभाग हा या कामात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, यासाठी सर्वांचे अभिनंदन करून यात असेच सातत्य ठेवावे अशी अपेक्षा ही पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.

नुकतेच नाशिक जिल्ह्याचा समावेश क्वालिटी सिटी अंतर्गत करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व शिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मॉडेल स्कुल योजना तसेच JEE व NEET प्रवेशासाठी सुपर ५० हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या ७५ हजार नोकरी देण्याच्या संकल्पानुसार जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर पात्र ५०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले असून यात देखील नाशिक जिल्हा अग्रस्थानी असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, ‘आनंदाचा शिधा’ या उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना डाळी, तेल अशा विविध सहा वस्तु अवघ्या शंभर रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच बेघर अथवा कच्ची घरे असणाऱ्या कुटुंबांना केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजने अंतर्गत जिल्ह्यात साधारण एक हजार 513 भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली असून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजने अंतर्गत ४८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना अशा विविध आवास योजनांच्या माध्यमातून आत्तापर्यंत साधारण एक लाख 19 हजार 80 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी साधारण एक लाख 3 हजार 651 घरकुले पूर्ण झाली असून पीएम जनमन योजने अंतर्गत आदिम जमातीतील पात्र 803 कुटुंबांना प्रती घरकुल दोन लाख अनुदानासह मंजूरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 317 लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता नुकताच १५ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

उमेद अभियान अंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पाच हजार 167 महिला स्वयंसहाय्यता गटांना 145 कोटी 46 लाखांचे बँकेमार्फत अर्थसहाय्य देण्यात आले. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत 80 दुकानांच्या निर्मिती करीता 3.38 कोटी अर्थसहाय्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फेब्रुवारी, 2023 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मिशन भगिरथ प्रयास राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत 15 लाख 44 हजार 780 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड देण्यात आले. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत एक लाख 10 हजार 166 लाभार्थ्यांना 522 कोटी व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत एकूण पाच हजार 192 लाभार्थ्यांना 12.10 कोटी रकमेचे मोफत उपचार करण्यात आले असल्याची माहिती ही पालकमंत्री यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

आपल्या सर्वांना नेहमीच अभिमान असणाऱ्या शहिदांच्या भूमीतील माती ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान अंतर्गत 1 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून दिल्ली येथे हुतात्म्यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या अमृत वाटीकेसाठी पाठविण्यात आली. तसेच जन जातीय गौरव दिवस १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत ‘हमारा संकल्प, हमारा भारत’ अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील एक हजार 388 ग्रामपंचायतीमध्ये फिरविण्यात आला असून शासकीय योजनांची माहिती त्यातून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात नाशिक जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 356 गावे ‘हर घर जल’ घोषित करण्यात आले. केंद्र शासनाकडून नोव्हेंबर 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा उपक्रमात जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, या उल्लेखनीय कामासाठी सर्व संबंधित यंत्रणांचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी अभिनंदन देखील केले.

जिल्ह्यात 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 15 तालुक्यातील पाच हजार 500 दिव्यांगाची तपासणी करण्यात आली असून त्यांना मोफत सहाय्यक साधने वाटपाचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लम्पी या चर्मरोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून एलएसडीचे आठ लाख 97 हजार 369 लसीकरण करण्यात आले. जखमी किंवा अपघातग्रस्त वन्यप्राण्यांवर त्वरीत आवश्यक औषोधोपचार होण्यासाठी नाशिक पश्चिम विभाग उपवनसंरक्षक यांच्यामार्फत जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत वन्यजीवांसाठी अपंगालय / प्रथोमोपचार केंद्र उभारण्याचे काम पूर्ण झाले. स्वच्छतेचे दूत म्हणून ओळखले जाणारे गिधाड या दुर्मिळ पक्ष्यांची संख्या नैसर्गिकरित्या वाढवून त्यांचे संवर्धन करण्याच्या हेतूने अंजनेरी येथे गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र निर्मितीसाठी शासकीय मान्यता प्राप्त झाली असून त्यासाठी रुपये 8 कोटी निधी मंजूर करण्यात आला. स्वयंसेवी संघटना व लोकसहभागातून मुख्य कामगिरी निर्देशक या अंतर्गत आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, पायाभूत विकास, स्वच्छता, पेयजल, सामाजिक विकास आर्थिक समावेश यासाठी देशातील एकूण 500 तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याची निवड करण्यात आली असून या तालुक्याचा आकांक्षित तालुका म्हणून विकास केला जाणार आहे. शासकीय यंत्रणांच्या माध्यामातून नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्यात येत आहे. या योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा. जिल्हा विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात सातत्याने अग्रस्थानी राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस दल, होमगार्ड, गृहरक्षक, शहर वाहतुक शाखा, अग्निशमन दल, भोसला मिलटरी पथक, उर्दु बडी दर्गा, पोलीस बॅन्ड पथक, डॉग युनिट आदी पथकांनी संचलन केले. तसेच विविध शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिमा पेटकर यांनी केले.

यांचा झाला सन्मान….

⏩ महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत भारतीय सैन्यदलातील शौर्यचक्र प्राप्त जवान ग्रुप कॅप्टन योगेश्वर कृष्णराव कांदळकर यांना एकरकमी रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

⏩ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार : भिमसेन गणपत पगारे, नाशिक, मनोहर त्र्यंबक कुलकर्णी, नाशिक, माधव नथु वाघ, निफाड, राजाभाऊ रखमाजी राजवाडे (मयत) मालेगाव यांच्या पत्नी केदाबाई राजवाडे, जान मोहम्मद उस्मान (मयत) मालेगाव यांच्या पत्नी अस्मानबानो मोहंमद, मोहयुद्दीन मोहमंद (मयत) मालेगाव यांच्या पत्नी नजीबुनिसा मोहमंद

⏩ राष्ट्रपती पदक : श्री. उत्तम राजाराम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक, श्री. अशोक लक्ष्मण काकड, सहा. पोलिस उपनिरिक्षक, पंचवटी पो.स्टे., श्री. नंदु रामभाऊ उगले, सहा. पोलिस उपनिरिक्षक, बीडीडीएस, श्री. नितीन विश्वनाथ संधान, पोलिस हवालदार, शहर वाहतूक शाखा, नाशिक, विनय देवरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, प्रमोद आहेर, सहा. पोलीस उपनिरीक्षक

⏩ पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह : प्रकाश डोंगरे, पोलीस हवालदार

⏩ विशेष सेवा पदक : राहुल घोलप, पोलीस नाईक, स्वप्निल रंधे, पोलीस नाईक

⏩ अनुकंपाभरती : भरत अशोक काकळीज (अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण), रोहित निंबा सोनवणे, शंतनु नानाजी कापडणीस, सुरज मोठाभाऊ साळुंके (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक), रेणुका राजेंद्र खोलकर, नरेंद्र सिताराम गांगोडे (उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक, मंडळ नाशिक), करणसिंग भगवानसिंग परदेशी, अमित प्रविण धिवरे (मुख्यवन संरक्षक, प्रादेशिक कार्यालय,नाशिक), दिवाकर मोहन वाघ (अधीक्षक अभियंता, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक), विशाखा राजेंद्र शिंपी (विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था, नाशिक), लक्ष्मीकांत श्रीकांत गायखे, बाबासाहेब गौतम बनसोडे, मयुर सुनिल मोढे, प्रथमेश सुनिल आढाव, अभिजीत ज्ञानेश्वर कदम, सुरज साहेबराव सोनवणे (उपसंचालक भूमी अभिलेख, नाशिक)

⏩         महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधनमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालये : एस.एन.बी.टी. इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, नाशिक, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक

⏩         कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत पुरस्कार : श्रीमती सायली ननावरे, श्रीमती सायली कुटे, कृतीका भंडारी, सुजल देशमुख, सोनल बागुल, ईश्वरी भरवटे, जिया खिवसरा, अर्जुन शिंदे, वेदांत पिंगळे, प्रशांत शिंदे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790