नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयातर्फे नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात युवाग्राम मैदान, हनुमान नगर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानिमित्त विविध राज्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारे स्टॉल याठिकाणी मांडण्यात आले आहेत. याठिकाणी नाशिकच्या मिसळसह विविध राज्यातील खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी अक्षरशः नाशिककरांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
युवा महोत्सवानिमित्त देशभरातील युवा प्रतिनिधी नाशिकमध्ये आलेले आहेत. त्यासोबतच त्या राज्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारे स्टॉल याठिकाणी मांडण्यात आल्याने नाशिककर खवय्यांसाठी ती पर्वणी ठरली आहे. या पदार्थांची चव घेऊन तृप्तीचा ढेकर देत आबालवृद्ध महोत्सवातील विविध कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घेताना दिसत आहेत.
जम्मू काश्मीर पासून ते तामिळनाडू पर्यंत आणि गुजरात ते उत्तर पूर्व राज्यातील विविध खाद्य पदार्थांची रेलचेल या ठिकाणी होती. विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर आपोआप त्यांची पावले या स्टॉल्सकडे वळत होती. येथील लज्जतदार पदार्थांची ही चव नाशिककरांच्या जिभेवर दीर्घकाळ रेंगाळणार हे मात्र नक्की! अर्थात, यानिमित्त विविध राज्यातील खाद्य पदार्थांची ओळख नाशिककरांना होत आहे.