नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जीममधून चोरी करणा-या चोरांना पोलिसांनी अवघ्या २४ तासात गजाआड केले आहे. या चोरांकडून १ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. गुन्हेशाखा युनिट १ ने ही कामगिरी केली असून या गुन्हेगारांना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी गंगापुर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजी नगर पोलीस चौकीसमोरील जीममध्ये ही चोरी झाली होती. सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हेशाखा युनिट क. १ यांनी केला. पोलिस हवालदार महेश साळुंके व पोलीस नाईक मिलींद परदेशी यांनी घटनास्थळाचे तात्काळ सीसीटीव्ही फुटेज पाहुन आरोपी हे सराईत असल्याची ओळख पटविली व त्या सराईत गुन्हेगारांची माहिती काढुन व त्यांचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी प्रकाश राजेंद्र विसपुते (३८) रा. आम्रपाली झोपडपट्टी उपनगर, नाशिक, निलेश विनायक कोळेकर,(३४) रा. केशरकुंज अपार्टमेंट, जेलरोड, नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.
त्यांनी जीममधुन चोरीस केलेले एमआय फोन, लिनोओ कंपनीचा लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचा ब्ल्यूटुथ स्पिकर व गुन्हयामध्ये वापरलेली रिक्षा क्रमांक MH 15 FU 3651 असा एकुण १,६३,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केला.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत तोडकर, पोहवा शरद सोनवणे, महेश साळुंके, पोना मिलींद परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राजु राठोड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांनी केली.