नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शाळा-महाविद्यालय परिसरात वाढत चाललेला घोळक्यांचा उपद्रव आणि त्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत गुंडाविरोधी पथकाने शनिवारी शहरातील महाविद्यालयांसह शाळा परिसरात विनाकारण फिरणाऱ्या १२ युवकांवर कारवाई करीत त्यांना पोलिसी खाक्या दाखवला.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संपर्कासाठी दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर नागरिकांच्या तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. त्यातील काही तक्रारींची माहिती घेऊन त्यामध्ये गुंडाविरोधी पथक कॉलेजसह शाळा परिसरात टवाळखोरांवर कारवाईसाठी सज्ज झाले आहे. त्यानुसार शनिवारी पहिल्याच दिवशी झालेल्या कारवाईत सुमारे १२ टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले.
कॉलेजरोडसह गंगापूर रोड येथे महाविद्यालयाच्या आसपास फिरणाऱ्या टवाळखोरांवर लक्ष केंद्रित करीत त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पकडलेल्या सर्वांना जागीच समज देत सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सोडून देण्यात आले, कॉलेजमधील शिक्षक व कर्मचारी यांना भेटून टवाळखोरांची माहिती गोळा केली जाते आहे. अशा टवाळखोरांकडून काही त्रास होत असेल तर तत्काळ गुंडा पथकाला किंवा कंट्रोलला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे तब्बल २० वर्षांपूर्वी पोलिस उपआयुक्त मकरंद रानडे यांनी केलेल्या कारवाईला उजाळा मिळतो आहे. त्या काळीही कॉलेजरोड परिसरात टवाळखोरांचा वाढलेला उपद्रव पाहून पोलिस पथक अचानक या ठिकाणी भेट देत होते. त्यावेळी रानडे यांची अँबेसेडर कॉलेजरोड परिसरात दिसली तरी टवाळखोर काही मिनिटात धूम ठोकत होते.
त्याचप्रमाणे त्यावेळचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय-वाहतूक) मंगलजीत सिरम यांनी रायडर्सला चांगलाच प्रतिबंध घातला होता.. जे युवक कॉलेजरोडला बेभानपणे रायडींग करत त्यांच्या बाईक्स जमा केल्या जात. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून घेत त्यांच्या समक्ष युवकांना समज दिली जात असे. त्यामुळे २००५-२००७ च्या दरम्यान ‘सिरम सर की क्लास’ चं नाशिककरांनी चांगलंच कौतुक केलं होतं !
32 Total Views , 1 Views Today