नाशिक: सिगारेट न दिल्याचा राग, चालत्या वाहनात पोलिसालाच मारहाण

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पायाला झालेल्या जखमेतून रक्त येत असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी नेताना सिगारेट न दिल्याच्या कारणातून एकाने थेट पोलिस अंमलदाराचाच गळा दाबून त्यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

एका अदखलपात्र गुन्ह्यातील फिर्यादीनेच हा प्रकार केल्याने त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून इंदिरानगर पोलिसांनी त्यास अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा:  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: नाशिक जिल्ह्यात ५० लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

इंदिरानगर पोलिस ठाण्यात कार्यरत अंमलदार नितीन प्रतापसिंह गौतम यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून मुजफ्फर उर्फ मुज्जू सुलतान कुरेशी (वय ३६, रा. म्हाडा वसाहत, वडाळा गाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कुरेशी याने दोन दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलिसांत एका नातलगाविरुद्ध भांडणावरून अदखलपात्र गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याच्या चौकशीकामी पोलिस अंमलदारांनी त्याला बोलावून घेतले.

हे ही वाचा:  नाशिक: स्टॉक ट्रेडिंगच्या बहाण्याने दाम्पत्याने केली दोन लाखांची फसवणूक

फिर्यादी असलेला कुरेशी पोलिस ठाण्यात आल्यावर त्याच्या पायातून रक्त येत होते. त्याच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी एक पथक दाखल झाले. त्यांनी संशयिताला वैद्यकीय उपचारासाठी नेण्याकरीता वाहनात बसविले. वाहन लेखानगरपर्यंत गेल्यावर संशयिताने सिगारेटची मागणी केली.

पोलिसांनी त्याला नकार दिला. तेव्हा अचानक आक्रमक होत संशयिताने अंमलदार गौतम यांना शिवीगाळ करून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. इतर पोलिसांनी त्याला आवरल्यानंतर वैद्यकीय उपचार करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०३५६/२०२३) संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी व तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790