नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दीपोत्सवामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टया असल्यामुळे प्रवासी संख्येत घट झाल्याने सिटी लिंकने शहरी भागातील बसफेऱ्या कमी केल्या आहेत. मात्र याच सिटी लिंक बसेस आता सिन्नर, त्र्यंबकेश्वर या मार्गावर दिसणार आहेत.
सुट्यांमुळे प्रवासी वाढल्याने पाडवा आणि भाऊबीज अर्थातच मंगळवार (दि. १४) आणि भाऊबीज (दि. १५) या दिवशी सिन्नर आणि त्र्यंबकेश्वरसाठी २० बसफेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून शहरात बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. या बससेवेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात प्रवासी वाहतूक केली जाते. मात्र सध्या दिपोत्सवाच्या सुट्यामुळे शहरातील प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ही सेवा पूर्णतः तोट्यात असल्याने विविध मार्गांनी उत्पन्न मिळवले जाते.
याच पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयाच्या मार्गावरील बसफेऱ्या सिटी लिंकने कमी केलेल्या आहेत. मात्र दुसरीकडे शहरात येणारे पर्यटक, प्रवाशांची संख्या लक्षात घेता सिटी लिंकच्या वतीने सिन्नर, त्र्यंबकेश्वर मार्गावरील फेऱ्या २० वाढविण्यात येणार आहे. तसेच गरज वाटल्यास या बसफेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येणार असून त्या दृष्टीने सिटी लिंकच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.