नाशिक (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सेवांतर्गत बी.एड. या शिक्षणशास्त्र शाखेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरवात झालेली आहे.
इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. प्रवेश पात्रतेसंदर्भातील सविस्तर सूचना व प्रवेश वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे.
२०२३ ते २०२५ या तुकडीच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध बाबींचा सविस्तर तपशील सूचनापत्रात नमूद केला.
यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वरूपात प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे; तर अर्जात दुरुस्तीसाठी १३ ते १५ सप्टेंबर अशी मुदत दिली जाईल.
विद्यापीठाने जारी केलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी यूजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी नोंदणी करावी. यानंतर प्रवेश अर्ज भरता येईल. अर्ज भरताना काहीही अडचण अथवा अडथळा आल्यास विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.