नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील डाटा मॅटीक समोरील उड्डाणपूलावर उभ्या ट्रकवर आयशर ट्रक जावून आदळल्याने टायर बदलत असलेला २० वर्षीय परप्रांतीय चालक ठार झाला.
राहूल बैसराम धाकड उर्फ यादव (२० रा.डोंगरगाव ता.जि.शिवपुरी मध्यप्रदेश) असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. जॅकवरून ट्रक निसटल्याने चालक दाबला गेला होता. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
यादव शनिवारी मुंबईकडून धुळयाच्या दिशेने आपल्या ताब्यातील एमपी ०९ एचएच ८६७५ हा मालट्रक घेवून जात असतांना हा अपघात झाला. उड्डाणपूलावरील डाटा मॅट्रीक समोर ट्रक पंक्चर झाल्याने तो थांबला असता ही घटना घडली.
जॅकवर मालट्रक चढवून तो टायर बदलत असतांना पाठीमागून भरधाव आलेला आयशर ट्रक (एमपी ०९ एचएच ८९७९) उभ्या असलेल्या ट्रकवर जावून आदळला.
या अपघातात उभा ट्रक जॅकवरून निसटल्याने चालक यादव दबला गेला होता. त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पोलिस नाईक बहिरम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालक भुरा कपुरीया बाबर (रा.जामली ता.महू जि.इंदोर मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.