नाशिक (प्रतिनिधी): तपोवनात रस्त्याने पायी जाणाऱ्या एकाचे मोबाईल व स्मार्ट वॉच जबरी लूट करणारे तीन संशयित ताब्यात घेण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार तासात या गुन्ह्याचा छडा लावला असून या संशयिताकडून चोरीच्या मुद्देमाल सह दुचाकी देखील हस्तगत करण्यात आले आहे.
या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप भास्कर डेरे मूळ संगमनेर येथून आपल्या मित्राकडे आले होते. तपोवनातून पायी जात असताना दुचाकी हून आलेल्या तीन संशयितांनी प्रदीप यांचे कडील मोबाईल हातातील स्मार्ट वॉच हे बळजबरीने हिसकावून नेले होते.
या बाबत आडगाव पोलिस ठाण्यात धाव घेत सदर प्रकार कथन केला व या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुरूवार (ता. ०३) रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वाढत्या चोरीचा घटना बघता संबधित पोलिस ठाणे गुन्हा उकल करण्याबाबत आदेशित केले होते.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे व गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून संशयित ईशांत शेखर शिंदे (वय १९ रा. खैरे गल्ली, भद्रकाली, नाशिक), तुषार चंद्रकांत काळे (वय १९, खैरे गल्ली भद्रकाली नाशिक) व प्रदीप दिलीप चव्हाण (वय २०, रा.गंगाघाट,पंचवटी, मूळ रा. दिग्रस, यवतमाळ) यांना ताब्यात घेतले.
पोलिस खाक्या दाखवित यांची कसून चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली.सदर ची कामगिरी पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त परीमंडळ एकचे किरण चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त, पंचवटी विभाग नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली आडगाव पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे, गुन्हे शोध पथकाचे अशोक पाथरे, पोलिस हवालदार सुरेश नरवडे, देवराम सूरंजे, ज्ञानेश्वर कहांडळ, पोलिस नाईक निलेश काटकर, दादासाहेब वाघ, पोलिस अंमलदार निखिल वाकचौरे, अमोल देशमुख, सचिन बाहीकर, विलास चारोसकर, दिनेश गुंबाडे यांनी कारवाई केली.