अजित पवारांना अर्थ, धनंजय मुंडेंना कृषी तर वळसे पाटलांना सहकार, दादांच्या ९ मंत्र्यांना वजनदार खाती!

पक्षनेतृत्वाशी विरोधी भूमिका घेऊन आणि त्यांच्याच विश्वासू नेत्यांना हाताशी धरुन ‘दादा’ नेते अजित पवार यांनी वेगळी चूल मांडत आगामी काळात भाजपशी संसार करण्याचं ठरवलं आणि २ जुलै रोजी शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

त्यांच्याबरोबर आणखीही ८ मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. शपथ घेऊन १२ दिवस उलटले तरी खातेवाटपाचं कोडं काही सुटत नव्हतं. अखेर आज खातेवाटपाला मुहूर्त मिळाला आहे. अजित पवार यांच्या गटातील नेत्यांना सगळी वजनदार खाती मिळालेली आहेत. शिंदे गटातील मंत्री आमदारांच्या विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलेलं आहे.

तर दिलीप वळसे पाटील यांना महत्त्वाचं मानलं जाणारं सहकार खाते देण्यात आलेले आहे. दुसरीकडे मराठवाड्याच्या अब्दुल सत्तार याच्याकडे असलेलं कृषी खातं काढून घेऊन ते फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलंय. तर आदिती तटकरे यांना अपेक्षेप्रमाणे महिला आणि बालकल्याण खाते मिळालेले आहे.

अजित पवारांसह नऊ मंत्र्यांचा समावेश सरकारमध्ये झाला असला, तरी या विस्ताराला दोन आठवडे उलटूनही नव्या मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नव्हते. महत्त्वाच्या खात्यांसह पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्ष सुरू होता. पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात तर उघड संघर्ष होता. त्यामुळे खातेवाटपाला विलंब होत होता. मात्र एकनाथ शिंदे-अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर खातेवाटपाचा तिढा सुटला.

कोणाला कोणतं खातं?:

  • अर्थ व नियोजन- अजित पवार
  • सहकार- दिलीप वळसे पाटील
  • कृषी- धनंजय मुंडे
  • अन्न व नागरी- छगन भुजबळ
  • महिला व बालविकास- आदिती तटकरे
  • क्रीडा- संजय बनसोडे
  • मदत व पुनर्वसन- अनिल पाटील
  • अन्न व औषध प्रशासन- धर्मरावबाबा अत्राम
  • वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ

कुणाची खाती काढून कुठली खाती दिली?:
अब्दुल सत्तार – कृषी खाते काढून- अल्पसंख्याक विकास, संजय राठोड- अन्न आणि औषध प्रशासन काढून मृदा आणि जलसंधारण, अतुल सावे- सहकार खाते काढून – ओबीसी कल्याण.

अर्थ खाते दादांकडे!:
खातेवाटपात शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल झालेला आहे. पवार गटाला अर्थ व नियोजन खाते व अन्यही एक महत्त्वाचे खाते मिळालं आहे. या खात्यामुळे पवार गटाची शहरी भागावरील पकड मजबूत होण्यास तसेच घराघरांत पोहोचण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790