नाशिक (प्रतिनिधी): उच्चशिक्षित असूनही बेरोजगारीमुळे यापूर्वी काम केलेल्या आलिशान रेस्टॉरंटमध्ये जाऊन चोरी करणाऱ्या संशयिताला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. शरद मोतिराम तिदमे (३०, रा. पळसे, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. त्याने २९ मे रोजी नाशिक-पुणे महामार्गावरील आंतरराष्ट्रीय कंपनीच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट निरीक्षक असल्याचे भासवून एक लाख २६ हजार रुपये लंपास केले होते. यापूर्वीही त्याने असा प्रयत्न केला होता. परंतु, पहिल्याच गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील आयनॉक्सशेजारील एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या रेस्टॉरंटमध्ये २९ मे रोजी सकाळी सहा वाजता चोरी झाली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांनी तपासाचे आदेश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रवीण चौधरी यांनी संशयिताचा माग काढला. सीसीटीव्ही आणि मोबाइलच्या तांत्रिक विश्लेषणातून संशयिताला पळसेतील जुना साखर कारखान्यातून ताब्यात घेण्यात आले. संशयित उच्चशिक्षित असून, त्याचे कुटुंब शेती करते.
तिदमेचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. २९ मे रोजी रात्रपाळी करणारे दोघे रेस्टॉरंटमध्ये काम करीत होते. त्यावेळी संशयिताने ‘मी निरीक्षक असून, नोंदवही दाखवा’, असे सांगितले. त्यावरून कंपनीतल्या स्टोअर मॅनेजरसह एका कर्मचाऱ्याने नोंदवही दाखवली. नोंदवही तपासल्यानंतर संशयिताने पैसे मोजण्यास सांगितले.
कर्मचारी तिजोरीतले पैसे मोजत असताना संशयिताने सीसीटीव्ही फुटेकडे बघत ‘तुमचा ओपन मॅनेजर आला आहे’, असे सांगितले. त्यामुळे कर्मचारी मुख्य प्रवेशद्वाराकडे गेला. तितक्यात संशयिताने मोजणी करीत असलेली एक लाख २६ हजार रुपये रोख रक्कम घेत मागील दरवाजाने धूम ठोकली. कर्मचारी पुन्हा आत आल्यावर चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. दुय्यम व्यवस्थापक सौरभ शेट्ये (२७, रा. पाथर्डी फाटा) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी तपास केला.